Thursday, May 19, 2016

जन्म

होते खिसे रिकामे
कामे बरीच होती
हुर हुर अंतरी ती
होती अगम्य भीती

मोजून पाहिले ना
माझे मला कधी मी
आले प्रसंग नाना
पाण्यात पोहताना

हातात सूर्य येता
उजळीत विश्‍व गेलो
अन स्‍नेह-चांदण्‍यात
मी अमृतात न्हालो

विश्‍वास मनी होता
श्‍वासात छंद आणि
रंगात चींब होता
मी इंद्रधनू झालो

मित्रांसवे असे मी
माझे मलाच गुणले
एकाच आयुष्याचे
मी जन्म दहा केले

आठव

आठव मनात
नित्याचाच उभा
सभा भरविती
प्रियजन      १

बोल कोणाचे ते
गुंजती कानात
कोणी हासतसे
गोडगोड     २

कोण धरी हात
कोणी घे जवळ
कवटाळी कोणी
हृदयाशी     ३

हात खांद्यावरी
येई कुठुनसा
फिरे केसातून
अलगद       ४

कौतुकाची दाद
दुरुनची साद
लटिकाची वाद
आठवतो     ५

खेळातले क्षण
क्षण खेळकर
हास्‍याची लकेर
सर्वदूर       ६

कोटीवर कोटी
शब्दांची शेकोटी
बोलण्‍याची खोटी
हासू फुटे      ७

बैसली पंगत
त्यात असे सण
पाहुणे तशात
संगतीला     ८

बैसोनी जवळ
प्रश्‍न ते प्रेमळ
प्रसन्न आभाळ
भोवताली    ९

जरी दूरदेशी
भेट क्षणोक्षणी
जशी ती पक्षीणी
तुकोबाची    १०

Thursday, April 3, 2014

गुढी



निळ्‍या आभाळात
गुढ्‍य़ा हिरव्याशा
उंच उभ्या सार्‍या
धरित्रीच्‍या आशा

झाड नव्हे झोका
सुखाचा,स्वप्नांचा
मन माझे झाले
थवा पाखरांचा



Wednesday, February 27, 2013

घरं


धरण फुटून पसरावं पाणी वेगानं
तशी पसरतायत घरं रानावनात
सरकतायत भिंती पुढे पुढे
निर्ढावल्‍यासारख्या..
झुगारून देतायत हक्क
आधीच्या सार्‍यांचा..
घरं चालली वर वर
करीत खुजं आभाळाला
खुरटं,लाचार आणि बिच्चारं

काळवंडलेला घेवून चेहेरा
रडत असतं हुंदके देत
एकटंच आभाळ
वैराण माळावर एकटंच कुठंतरी
एखाद्याच उरलेल्या भुंड्‍या झाडाच्या
तुटपुंज्या सावलीला.

कधी कधी तर
झाडच नसतं नजरेच्या टप्प्यात.
होत नाहीत सहन
पायाला चटके
आणि
मग फिरत बसतं
उगिचच
गोल गोल वेड्‍यासारखं.
दिशाहीन.


Wednesday, July 4, 2012

फूल


काळोखाच्या घट्ट मिठीतच
उमलायाचे फूल कोवळे
शुभ्र,सुकोमल,निर्मळ आणि
हसायचे मग तृप्त मळे

दो दिवसांची जहागिरी अन
दो दिवसांचे सोहळे
पुन्हा भुईच्या आत शिरावे
विखरून सारे गंधकळे

उजेड,वारा,पाऊसधारा
दवबिंदूचे सूक्ष्म तळे..
जीवन माझे फूलच केवळ
बंधमुक्त ते मोकळे!

Sunday, March 4, 2012

बंदीवान


लेखक लिहित बसतो रात्र रात्र
वेड्‍यासारखा,
शब्दांना प्रार्थना करीत,
‘दार उघड’असं म्हणत
प्रतीभेलाही घालतो तो साकडं..
आठवणीतल्या प्रसंगांना
पालथं घालून,
त्याची पायपीट
थांबत असेल
कुठल्यातरी
नव्या गावापाशी,
पण
मिळतो का त्याला
प्रवेश?
की अडवतच असतात
त्याच्याच मनातल्या
संकुचित विचारांचे रखवालदार,
स्वातंत्र्याच्या रस्त्यावर
फिरायला घालीत बंदी,
कलम नंबर
नवेच लावून
नव्याच कायद्याखाली?

शिकारी बाटल्या!


बाटल्या उभ्या वाट बघत
नात्यांना न जुमानणार्‍या,
फक्‍त स्वत:चं सुख शोधणार्‍या,
सवयीच्या साच्यात अडकलेल्या,
परिणामांचा विचार न करणार्‍या,
माणसांचा बळी घेण्यासाठी,
दारू नावाचं
विष पिऊन,
दुकानात
दाटीवाटीनं...

Wednesday, June 22, 2011

दोर





अंतराशी घट्ट
दोर घे बांधून
नको सोडू भान
अचानक

वादळाचे वारे
दिवस अंधारे
हात हे कापरे
तुझे माझे

असू एक आज
एक ठायी जरी
प्रेमाची शिदोरी
सरलेली

झाकळल्या दिशा
आभाळ ही सरे
डोळ्यात न उरे
तेज आता

Tuesday, September 14, 2010

मातीचा पुतळा




रोज रोज दिठी
पल्याडच्या गावी
येथला मुक्काम
संपलेला १

श्वासाची गणिते
आभाळाच्या भाळी
उत्तर शेवटी
बाकी शून्य! २

कोण, कुठे, कधी
असा मी झोपून
काय काय लोक
बोलतात ३

काय कुठे वाजे
कोण हे हासले?
कितीसे वाजले
कोण जाणे? ४

झोपली गोठयात
गायी नि वासरे
डोळे पेंगुळले
शेवटले ५

झोपलेल्या माझ्या
देहात मी कुठे ?
कोण जागे
कोण झोपलेले ! ६

मनाचं पवित्र,
देखणं पाखरू!
काय आता करू
कोठे जावू ? ७

कोण ओळ्खीचे
कसली ती नाती?
दिवसांच्या वाती
विझलेल्या ८

किती चालायचे?
किती ऐकायचे?
बोलण्याने आता
काय साधे? ९

कधीचा प्रवास
काय झुंजायचे?
पाय थकलेले
जडशीळ १०

किती, कसे, रडू?
आणि कुणासाठी?
हाक आता कुणा
मारायची? ११

बसून उठता
उठून चालता
इतके धावून
काय केले? १२

अश्रूंची सोबत
मागेच थांबली
आता गळासुद्धा
ओला नाही १३

दॄष्टीपुढे नाही
रेघ उजेडाची
अंधाराची ढोली
जग वाटे १४

थांबले आवाज
कशीशी शांतता
कुजबूज, कोणी
बोलले का? १५

चंद्राची भावली
ढगात धावली
आभाळाची थाळी
थरारली! १६

पाखरू प्राणाचे
पंखात दडले
कधीचे अडले
फांदीवर १७

किती सोसायचे
काळाचे फटके?
आणि हासायचे
लटकेच १८

उभा जन्म उभा
वेदनेच्या तीरी
पाण्यात राहून
तहानेला १९

आई माझी मोठी
धीराची, शहाणी
तिच्या आठवणी
आठवती २०

भावंडांच्या भेटी
सणाला,संकटी
आता ताटातुटी
कायमची २१

विस्कटून पुन्हा
टाकायची नाती
मातीचा पुतळा
मोडायचा २२

प्रश्न माझे थोडे
आठ किंवा दहा
एका उत्तराने
सर्व मुके! २३

कोणता हा देश
कोणत्या वाटेला
घोडा कुणी इथे
बांधलेला २४

झाड हे लिंबाचे
वाटे ओळखीचे
माझ्या माहेराचे
शेत वाटे २५

रानात दाटीने
बाभळी हिरव्या
पोर एवढेसे
बकरीचे २६

रंगीत पटका
खांद्यावर काठी
उंच धनगर
ओळ्खीचा २७

ओढ्यावर धुणी
खळाळत पाणी
पाखरांची गाणी
सोबतीला २८

आली बैलगाडी
चाळ हे मंजूळ
पाहुणा प्रेमळ
गाडीवान २९

हासुनिया पुसे
जायचे का कोठे
उपकार मोठे
त्याचे झाले ३०

वारकरी आम्ही
नाही दुजी आस
खास वैकुंठाचे
बोलावणे ३१

चंद्रभागा आली
वाटेत आडवी
उडवित पाणी
अंगावर ३२

राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
कळसाला तेज
सोनियाचे ३३

अभिषेक पूर्ण
प्राणाचा करून
ग्रंथाची समाप्ती
जगण्याच्या! ३४

Tuesday, September 7, 2010

प्रेममय


प्रेमे विश्व हाले
प्रेमे चंद्र चाले
प्रेमेचि निर्मळ
जळ वाहे

अमृताचे प्याले
ढग ओले ओले
प्रेमेचि वर्षती
धरेवर

वाहुनि काहिली
उन्हाच्या कढत
सावली प्रेमाची
वृक्ष देती

प्रेमेचि कष्टती
शेतकरी बंधू
धन्य कृपासिंधू
अन्नदाते

प्रेमे डोळा पाणी
काळजात ओल
हृदयात खोल
हळ्हळ

प्रेमाचा आदर



प्रेमाचा आदर,
आदर फुलांचा,
तृण, पाखरांचा,
सर्व काळ

प्रेमाचा आदर,
आदर पाण्याचा,
मातीचा,वार्‍याचा,
सदा राहो

प्रेमाचा आदर,
आदर पित्याचा,
मातेचा, जनांचा,
मनी दाटो

प्रेमाचा आदर,
आदर जन्माचा,
बाल्य, तारुण्याचा,
वृध्दी लागो

प्रेमाचा आदर,
आदर सत्याचा,
सत्वाचा, भावाचा,
क्षणो क्षणी