जन्म
होते खिसे रिकामे
कामे बरीच होती
हुर हुर अंतरी ती
होती अगम्य भीती
मोजून पाहिले ना
माझे मला कधी मी
आले प्रसंग नाना
पाण्यात पोहताना
हातात सूर्य येता
उजळीत विश्व गेलो
अन स्नेह-चांदण्यात
मी अमृतात न्हालो
विश्वास मनी होता
श्वासात छंद आणि
रंगात चींब होता
मी इंद्रधनू झालो
मित्रांसवे असे मी
माझे मलाच गुणले
एकाच आयुष्याचे
मी जन्म दहा केले
आठव
आठव मनात
नित्याचाच उभा
सभा भरविती
प्रियजन १
बोल कोणाचे ते
गुंजती कानात
कोणी हासतसे
गोडगोड २
कोण धरी हात
कोणी घे जवळ
कवटाळी कोणी
हृदयाशी ३
हात खांद्यावरी
येई कुठुनसा
फिरे केसातून
अलगद ४
कौतुकाची दाद
दुरुनची साद
लटिकाची वाद
आठवतो ५
खेळातले क्षण
क्षण खेळकर
हास्याची लकेर
सर्वदूर ६
कोटीवर कोटी
शब्दांची शेकोटी
बोलण्याची खोटी
हासू फुटे ७
बैसली पंगत
त्यात असे सण
पाहुणे तशात
संगतीला ८
बैसोनी जवळ
प्रश्न ते प्रेमळ
प्रसन्न आभाळ
भोवताली ९
जरी दूरदेशी
भेट क्षणोक्षणी
जशी ती पक्षीणी
तुकोबाची १०