Tuesday, September 14, 2010

मातीचा पुतळा




रोज रोज दिठी
पल्याडच्या गावी
येथला मुक्काम
संपलेला १

श्वासाची गणिते
आभाळाच्या भाळी
उत्तर शेवटी
बाकी शून्य! २

कोण, कुठे, कधी
असा मी झोपून
काय काय लोक
बोलतात ३

काय कुठे वाजे
कोण हे हासले?
कितीसे वाजले
कोण जाणे? ४

झोपली गोठयात
गायी नि वासरे
डोळे पेंगुळले
शेवटले ५

झोपलेल्या माझ्या
देहात मी कुठे ?
कोण जागे
कोण झोपलेले ! ६

मनाचं पवित्र,
देखणं पाखरू!
काय आता करू
कोठे जावू ? ७

कोण ओळ्खीचे
कसली ती नाती?
दिवसांच्या वाती
विझलेल्या ८

किती चालायचे?
किती ऐकायचे?
बोलण्याने आता
काय साधे? ९

कधीचा प्रवास
काय झुंजायचे?
पाय थकलेले
जडशीळ १०

किती, कसे, रडू?
आणि कुणासाठी?
हाक आता कुणा
मारायची? ११

बसून उठता
उठून चालता
इतके धावून
काय केले? १२

अश्रूंची सोबत
मागेच थांबली
आता गळासुद्धा
ओला नाही १३

दॄष्टीपुढे नाही
रेघ उजेडाची
अंधाराची ढोली
जग वाटे १४

थांबले आवाज
कशीशी शांतता
कुजबूज, कोणी
बोलले का? १५

चंद्राची भावली
ढगात धावली
आभाळाची थाळी
थरारली! १६

पाखरू प्राणाचे
पंखात दडले
कधीचे अडले
फांदीवर १७

किती सोसायचे
काळाचे फटके?
आणि हासायचे
लटकेच १८

उभा जन्म उभा
वेदनेच्या तीरी
पाण्यात राहून
तहानेला १९

आई माझी मोठी
धीराची, शहाणी
तिच्या आठवणी
आठवती २०

भावंडांच्या भेटी
सणाला,संकटी
आता ताटातुटी
कायमची २१

विस्कटून पुन्हा
टाकायची नाती
मातीचा पुतळा
मोडायचा २२

प्रश्न माझे थोडे
आठ किंवा दहा
एका उत्तराने
सर्व मुके! २३

कोणता हा देश
कोणत्या वाटेला
घोडा कुणी इथे
बांधलेला २४

झाड हे लिंबाचे
वाटे ओळखीचे
माझ्या माहेराचे
शेत वाटे २५

रानात दाटीने
बाभळी हिरव्या
पोर एवढेसे
बकरीचे २६

रंगीत पटका
खांद्यावर काठी
उंच धनगर
ओळ्खीचा २७

ओढ्यावर धुणी
खळाळत पाणी
पाखरांची गाणी
सोबतीला २८

आली बैलगाडी
चाळ हे मंजूळ
पाहुणा प्रेमळ
गाडीवान २९

हासुनिया पुसे
जायचे का कोठे
उपकार मोठे
त्याचे झाले ३०

वारकरी आम्ही
नाही दुजी आस
खास वैकुंठाचे
बोलावणे ३१

चंद्रभागा आली
वाटेत आडवी
उडवित पाणी
अंगावर ३२

राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
कळसाला तेज
सोनियाचे ३३

अभिषेक पूर्ण
प्राणाचा करून
ग्रंथाची समाप्ती
जगण्याच्या! ३४

Tuesday, September 7, 2010

प्रेममय


प्रेमे विश्व हाले
प्रेमे चंद्र चाले
प्रेमेचि निर्मळ
जळ वाहे

अमृताचे प्याले
ढग ओले ओले
प्रेमेचि वर्षती
धरेवर

वाहुनि काहिली
उन्हाच्या कढत
सावली प्रेमाची
वृक्ष देती

प्रेमेचि कष्टती
शेतकरी बंधू
धन्य कृपासिंधू
अन्नदाते

प्रेमे डोळा पाणी
काळजात ओल
हृदयात खोल
हळ्हळ

प्रेमाचा आदर



प्रेमाचा आदर,
आदर फुलांचा,
तृण, पाखरांचा,
सर्व काळ

प्रेमाचा आदर,
आदर पाण्याचा,
मातीचा,वार्‍याचा,
सदा राहो

प्रेमाचा आदर,
आदर पित्याचा,
मातेचा, जनांचा,
मनी दाटो

प्रेमाचा आदर,
आदर जन्माचा,
बाल्य, तारुण्याचा,
वृध्दी लागो

प्रेमाचा आदर,
आदर सत्याचा,
सत्वाचा, भावाचा,
क्षणो क्षणी